देशातील आठ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० एप्रिल २०२३ ।  राज्यासह देशात तापमानाने उच्चांक गाठला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आंध्र प्रदेशसह आठ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उन्हामुळे अनेक राज्यांत परीक्षांच्या काळातही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर काही राज्यांत शाळांच्या वेळा अलीकडे आणून विद्यार्थ्यांना ऊन वाढण्यापूर्वी घरी पाठविले जात आहे.

पुढील दोन दिवस कमाल तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले असले तरी आंध्रशिवाय उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, सिक्कीम, ओडीशा व उत्तर प्रदेश अशा आठ राज्यांत उष्णतेच्या लाटेमुळे दक्षतेचा इशारा देण्यात आला. सकाळी आठ वाजता जारी करण्यात आलेल्या वार्तापत्रानुसार उत्तर प्रदेश आणि बंगाल या राज्यांतील गंगेच्या किनाऱ्यावरील भागांत उष्णता वाढण्याची शक्यता आहे. या पट्ट्यात बंगालमध्ये गेले आठ, तर बिहारमध्ये गेले पाच दिवस उष्णता कायम आहे. ईशान्य, उत्तर, पूर्व आणि मध्य या विभागांतील अनेक भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली. हिमालयाच्या पश्चिम विभागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. बुधवारी काही भागांत थंड हवा आणि हलक्या पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला.
राज्यांच्या उपाययोजना

पश्चिम बंगाल : राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था आठवडाभर बंद ठेवण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. शाळेतून घरी आल्यानंतर डोकेदुखी तसेच इतर शारीरिक त्रासाच्या तक्रारी मुले करीत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

दिल्ली : दुपारच्या वेळेत शाळेत मुलांना एकत्र आणण्याचे उपक्रम आयोजित करू नयेत असा आदेश दिल्ली सरकारने जारी केला.

बिहार : बुधवारपासून शाळांमधील सर्व वर्ग सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत संपवावेत आणि शाळा सोडावी असा आदेश पाटणा जिल्हा प्रशासनाने जारी केला.

त्रिपुरा : राज्यातील सर्व सरकारी शाळा २३ एप्रिलपर्यंत बंद ठेवाव्यात असा आदेश मुख्यमंत्री माणिक साहा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जाहीर केला. खासगी शाळांनाही असा निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

मेघालय : पश्चिम गारो हिल्स जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून तीन दिवस सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला.

ओडिशा : राज्यातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रे चार दिवस बंद ठेवण्याचा आदेश सरकारने जारी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम