हिंदुत्व आमचा श्वास ; नितेश राणेंची जोरदार टीका !
दै. बातमीदार । १६ जुलै २०२३ । राज्यात गेल्या काही दिवसापासून दोन समाजात तेढ निर्माण होवून वातावरण खराब होण्याचे काम सुरु असल्याची टीका होत असतांना माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील सकल हिंदू मोर्चाला भाजपचे नेते आ.नितेश राणे यांनी उपस्थिती लावली होती.
छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्या विचारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचे लाड सहन केले जाणार नाहीत. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, त्यास धक्का लावाल तर परिणामांना सामोरे जा, असा थेट इशारा भाजप आमदार नीतेश राणे यांनी दिला. सकल हिंदू मोर्चाला संबोधित करताना बोलत होते. आमदार राणे पुढे म्हणाले, सक्तीने धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद यांसारख्या घटना घडविणाऱ्यांना आणि हिंदूविरोधी औरंगजेब तसेच टिपू सुलतानचे स्टेटस ठेवणाऱ्यांना इशारा देण्यासाठी मी आलो आहे.
आमदार राम सातपुते यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणाला विरोध करतानाच हिंदू विरोधी अपप्रवृत्तींना इशारा दिला. तर धैर्यशील मोहिते- पाटील यांनी तथाकथित तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याऐवजी मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्टेटस ठेवण्याचा सल्ला दिला. वेळापूर येथे ५ जुलैला चार तरुणांनी इन्स्टाग्रामला औरंगजेब आणि टिपू सुलतानचे स्टेटस व्हिडिओ ठेवल्यानंतर सामाजिक तेढ निर्माण झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. स्टेटस प्रकरणाचा निषेध म्हणून सकल हिंदू मोर्चाचे आयोजन केले होते. तत्पूर्वी दुपारी दीडच्या सुमारास आमदार राणे, सातपुते आणि मोहिते- पाटील यांच्या उपस्थितीत पालखी चौकातील छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून मोर्चाची सुरवात झाली. अर्धनारी नटेश्वर मंदिरात महाआरतीनंतर मोर्चा जुना बाजारपेठ, व्यापारी पेठ, जुने एसटी बस स्थानक मार्गे पालखी मैदानावर सभास्थळी दाखल झाला. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सकल हिंदू मोर्चाचे संयोजक स्वप्नील माने-देशमुख, संतोष खराडे, ओंकार आडत यांच्यासह ५ जुलैच्या स्टेटस प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल केलेले प्रशांत सावंत, सोमनाथ कोडक आणि माजी सैनिक भीमराव इंगोले यांचा सन्मान झाला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम