त्यांचे मत मला मान्य आणि माझे मतही त्यांना मान्य ; संभाजी राजे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ नोव्हेबर २०२२ ”हर हर महादेव’ चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास केला आहे. असे चित्रपट आपण लोकांपुढे घेऊन जायचे का? ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली चित्रपटात काहीही दाखवायचे? स्वातंत्र्य असले तरी इतिहासाचा गाभा सोडून हे लोक चित्रपट निर्मिती करत आहेत,’ असा प्रश्न संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.

शिवकालीन इतिहासावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप करत संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली. यासंदर्भात त्यांनी काल पुणे इथे पत्रकार परिषद घेत आक्रमक इशाराही दिला आहे. ‘ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात आहे. अशा स्वरूपाच्या चित्रपटांमध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात येत असून, ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या दोन चित्रपटांवर आक्षेप आहे,’ असं संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. इतिहासाची मोडतोड कराल तर माझ्याशी गाठ आहे, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी बोलताना संभाजीराजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबतच्या ट्युनिंगवरही भाष्य केलं आहे.

‘माझा आणि उदयनराजेंचा या चित्रपटांना पाठिंबा असल्याचं खोटं चित्र काही निर्मात्यांनी उभं केलं. मात्र आम्ही दोघे अशा चित्रपटांविरोधात आहोत. दोघांचेही ट्युनिंग चांगले आहे. त्यांचे मत मला मान्य असते आणि माझे मतही त्यांना मान्य असते. या विषयावर आम्ही दोघेही कट्टर आहोत,’ असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम