शिंदे-फडणवीसांच्या हाताखाली मी खूश ; महसूल मंत्री विखे पाटील !
दै. बातमीदार । २९ एप्रिल २०२३ । राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये येत त्यांना मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असल्याच्या अनेक बातम्या आल्यानंतर त्यांनी माध्यमासमोर आपली भूमिका मांडल्यानंतर हे राजकीय वातावरण थांबले तोच पुन्हा एकदा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान केल्यानंतर पुन्हा राजकारण तापले होते. त्यावर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कि, अब्दुल सत्तार माझे मित्र आहेत. भावनेच्या भरात ते काहीही बोलतात. त्याला काहीही अर्थ नाही. शिंदे-फडणवीसांच्या हाताखाली मी खूश आहे, अशी सारवासारव देखील त्यांनी केली आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर भाष्य करताना ‘विखेचालिसा’च वाचला होता. हनुमानाप्रमाणे माझी छाती चिरून बघितली तर हृदयसिंहासनावर ‘राधाकृष्ण’च दिसतील, असे सत्तार म्हणाले होते. विखे पाटील यांनी मुख्यमंत्रीपदापेक्षाही मोठे व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. अब्दुल सत्तारांच्या ‘विखेचालिसा’वर सारवासारव करताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची चांगलीच दमछाक झाली. अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र आहेत. भावनेच्या भरात ते काहीही बोलतात. मुख्यमंत्री बदलाचा दावा, त्यावरील चर्चा सर्व व्यर्थ आहे. शिंदे-फडणवीसांच्या हाताखाली मी खूश आहे, असे विखे पाटील म्हणाले. एकेकाळी अब्दुल सत्तार यांच्या हृदयसिंहासनावर अशोकराव चव्हाण विराजमान होते. चव्हाणांशिवाय सत्तारांचे पान हलत नव्हते. सत्तारांच्या हृदयात काही दिवस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही वास होता. अशोकराव उतरले, फडणवीस गेले आणि राधाकृष्ण विखे पाटील सत्ताराच्या मनाच्या कोपर्यात केव्हा येऊन बसले, असा गमतीदार प्रश्न लोकांना यानिमित्ताने पडला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम