…त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी नागपुरात आलो ; राज ठाकरे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ डिसेंबर २०२२ ।  आज नागपूर दौऱ्यावर आलेले राज ठाकरे यांच्याहस्ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रं देण्यात आलं. यावेळी झालेल्या छोटेखानी सभेत त्यांनी विरोधकांवर टीका केली. नागपूरच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रं द्यायची होती. 300 पदाधिकारी त्यासाठी मुंबईत येणार होते. हे कळल्यानंतर मी म्हटलं नागपूरहून 300 लोकं मुंबईला येण्यापेक्षा एकटा माणूस नागपूरला येणं बरं नाही का? म्हणून मी आज इथे आलो आहे, असं राज ठाकरे म्हणाले. मागच्यावेळी मी विदर्भाच्या दौऱ्यावर आलो होतो. मी निघून गेल्यावर मनसेला पदाधिकाऱ्यासाठी माणसं मिळत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. ज्यांनी बातम्या टाकल्या होत्या त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी ही नियुक्ती पत्रं तुमच्यासमोरच देण्यात आली, असं ते म्हणाले. राजकीय पक्षाची वाढ होताना काय अडचण येते याबाबतचं एक चांगलं वाक्य आहे. बहुधा महात्मा गांधी यांचं ते वाक्य असावं. सुरुवातीला काम करताना समोरचे विरोधक हसतात. कालांतराने ते तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात.

मग कालांतराने यांच्याशी लढलं पाहिजे असं त्यांच्या लक्षात येतं. ते आपल्याशी लढायला येतात. मग आपण जिंकतो. त्यामुळे ज्यांना हसायचं असेल तर हसावं. कालांतराने यांच्या लक्षात येईल हे मोठे झाले. यांचे आमदार, खासदार, नगरसेवक निवडून येऊ लागले आहेत, असं ते म्हणाले. सर्वच राजकीय पक्ष या प्रक्रियेतून जात असतात. पूर्वी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता भाजपचा झाला. कालांतराने मतदार त्याच त्याच लोकांना कंटाळतात. आज माझ्या पदाधिकाऱ्यांना म्हणतील हे पोट्टं काय करणार? हेच पोट्टं तुमच्यावर नंतर वरवंटा फिरवेल, असं ते म्हणाले.

तुमच्या आत आग असली पाहिजे. यश आपसूकच येईल. पराभव होत असतो. पराभव कुणाचा नाही झाला? जगात दिग्गजांचे पराभव झाले. 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. 1952 साली त्यांनी जनसंघ स्थापन केला. किरकोळप्रमाणात त्यांचे लोकं निवडून येत होते. मध्ये आणीबाणी आली. 1980ला जनसंघाचं भाजप झालं. 1996ला अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. मग 1998 ला पुन्हा वाजेपेयी पंतप्रधान झाले. मग 1999ला पुन्हा पंतप्रधान झाले. या तिन्हीवेळा त्यांना पूर्ण बहुमत नव्हतं. पण खऱ्या अर्थाने भाजपला 2014ला बहुमत मिळालं. 1952 ते 2014… कितीही मतभेद असले… काही असले तरी काम करण्याच्या सातत्यातून त्यांना 2014मध्ये यश आले. इतकी वर्ष गेली. किती पिढ्या गेल्या. किती लोकांनी काम केले असेल. काँग्रेसचा संघर्षही काही कमी नाहीये. 1966 साली स्थापन केलेली शिवसेना. शिवसेनेचा कधी पोटनिवडणुकीत एखादा आमदार निवडून यायचा. कधी नगरसेवक यायचा. 1984-85 साली एकटे छगन भुजबळ निवडून आले. 1990ला खऱ्या अर्थाने शिवसेनेचे खासदार निवडून आले. 1995ला शिवसेनेची सत्ता आली. 1966 ते 1995 हा संपूर्ण संघर्ष आणि मेहनतीचा काळ होता. त्यानंतर त्यांना यश मिळालं, असंही त्यांनी सांगितलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम