“मी पक्षाचा संस्थापक सदस्य, अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो”; उत्तम जानकर यांचा इशारा
दै. बातमीदार | २३ एप्रिल २०२४ | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत नणंद-भावजय अर्थात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी शरद पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता उत्तम जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत बोलताना आपल्या पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “मी पक्षाचा संस्थापक सदस्य असून मीच अजित पवार यांना पक्षातून काढून टाकू शकतो”, असे विधान उत्तम जानकर यांनी केले आहे.
“मला अजून पक्षातून काढून टाकलेले नाही. मी देखील दररोज विचारत आहे की, मला पक्षामधून काढले का? कारण पक्षाचा संस्थापक सदस्य मी पण आहे. मीच अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो. कारण मी पक्षाचा सदस्य आहे. शरद पवारांना अजितदादा काढून टाकत असतील तर उत्तम जानकर अजित पवारांना काढायला अडचण काय? काढू शकतो”, असे उत्तम जानकर म्हणाले.
तसेच, उत्तम जानकर यांनी काही दिवसांपूर्वी चार्टर विमानाने नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. परंतु, विमानवारी करूनही भाजपाच्या पाठिंब्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही. त्यानंतर काहीच दिवसांत उत्तम जानकर यांनी तुतारी फुंकली. तसेच शरद पवारांबरोबर जावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे स्पष्टीकरण जानकरांनी दिले होते. यानंतर उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर अनेकदा निशाणा साधला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम