बातमीदार | २३ ऑगस्ट २०२३ | जागतिक बाजारात पण सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत. सोन्याला इच्छित टप्पा गाठता येत नसल्याचे चित्र आहे. सोने एका मर्यादेबाहेर पुढे जात नसल्याचे दिसून आले. सराफा बाजारात सोन्यापेक्षा चांदी सूसाट आहे. गेल्या तीन दिवसांपासून जागतिक बाजारात सोने-चांदीला अच्छे दिन आले आहेत. खरेदीदारांना मध्यंतरी स्वस्ताईचा लाभ मिळाला. सोन्याला अजूनही सर्वकालीन उच्चांक मात्र गाठता आला नाही. दोन्ही धातूंनी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात सर्वकालीन उच्चांक गाठला होता. मे आणि जून महिन्यात त्याला मोठी झेप घेता आली नाही. तर जुलै महिन्यात किंमती वधारल्या होत्या. या महिन्यात पण दोन्ही धातूंना विशेष कामगिरी बजावता आलेली नाही. सततच्या घसरणीनंतर या आठवड्यात सोने-चांदीने उसळी घेतली. किती वाढल्या किंमती, जाणून घ्या.
डॉलर जागतिक बाजारात अजूनही मजबूत स्थितीत आहे. अमेरिकेच्या गंगाजळीत आवक सुरुच आहे. दुसरीकडे चीनच्या अर्थव्यवस्थेने घसरणीचा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडींमुळे सोने-चांदी दबावाखाली आहे. त्यांना मोठी उसळी घेण्यास बळ मिळाले नाही. सततच्या घसरणीनंतर सोने-चांदीने उसळी घेतली आहे. या महिन्यात सोन्यात 1, 5 ऑगस्ट नंतर या आठवड्यात दोन्ही धातूंनी दरवाढीचा बिगुल वाजवला. 21 ऑगस्ट रोजी सोन्याच्या भावात 50 रुपयांची वाढ झाली. 22 ऑगस्ट रोजी भावात बदल झाला नाही. 22 कॅरेट सोने 54,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,220 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली.17 ऑगस्ट रोजी किंमती 350 रुपयांनी घसरल्या. 18,19,20 ऑगस्ट रोजी भावात बदल नाही. गुडरिटर्न्सने ही आकडेवारी दिली आहे.
ऑगस्ट महिन्यात चांदी 6000 रुपयांनी स्वस्त झाली होती. 16 ऑगस्ट रोजी चांदीने घसरणीला ब्रेक लावला होता. भाव 200 रुपयांनी वाढले होते. 18 ऑगस्ट रोजी चांदीने 1000 रुपयांची चढाई केली. 19 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची घट झाली. 21 ऑगस्ट रोजी किंमतीत पुन्हा 200 रुपयांची वाढ झाली. 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,800 रुपये आहे. 24 कॅरेट सोने 58,657 रुपये, 23 कॅरेट 58,423 रुपये, 22 कॅरेट सोने 53,729 रुपये, 18 कॅरेट 43,992 रुपये, 14 कॅरेट सोने 34,314 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,140 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम