शिंदे सरकार गेले नाही तर…संजय राऊत आक्रमक
दै. बातमीदार । २३ नोव्हेबर २०२२ । राज्यातील शिंदे सरकार जर गेले नाही तर राज्याचे ५ तुकडे होतील, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बेळगाव सीमाप्रश्न अजून सुटलेला नसताना कर्नाटक राज्य आता कोल्हापूरच्या पुढे जाऊन सांगली जिल्ह्यातील तालुक्यावर दावा करत आहेत. तरीही शिंदे सरकार गप्प आहे. हे सरकार लवकर गेले नाही तर महाराष्ट्राचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मांडले आहे.
संजय राऊत म्हणाले, कुणाला महाराष्ट्रातून मुंबई तोडायची आहे, कुणाला गाव, जिल्हे तोडायचे आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरू आहे. तरीदेखील आता आमचे मुख्यमंत्री त्यांच्या 50 आमदारांसह गुवाहाटीला जात आहे. ते गुवाहाटीला गेल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्राचा काही भाग मागितला नाही म्हणजे मिळवल, असा टोला राऊतांनी लगावला.
संजय राऊत म्हणाले, शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करूनही राज्यपालांनी अद्याप माफी मागितलेली नाही. फडणवीस त्यांचे समर्थन करत आहेत. तर, मुख्यमंत्री शिंदे गप्प आहेत. असे सरकार सीमा प्रश्न काय सोडवणार? आदित्य ठाकरे आज बिहारच्या दौऱ्यावर आहेत. त्यावर संजय राऊत म्हणाले, बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यामदतीने परिवर्तन केले. महाराष्ट्रातही लवकरच असे परिवर्तन होईल. आदित्य ठाकरे हे तेजस्वी यादवांची भेट घेणार आहे. देशात अशा तरुण नेत्यांची मजबूत फळी उभारण्यासाठी ही भेट महत्त्वाची आहे. देशातील सर्व तरुण नेत्यांना आदित्य ठाकरेंची भेट घ्यायची आहे. याकडे एक राष्ट्रीय राजनिती म्हणून बघितले पाहीजे. शिंदे सरकारने संजय राऊतांसह अनेक विरोधी नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. त्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, एका क्षणात सर्व विरोधी नेत्यांची सुरक्षा हटवण्यात आली. आमच्या जीवाचे काही झाले तर त्याला सरकार जबाबदार राहील. सुरक्षा काढली म्हणून आम्ही काम करणे थांबवू, असे सरकारला वाटत असेल तर ही सरकारची चूक आहे. आम्ही काम करतच राहू.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम