पुण्यात निवडणुकीपूवीच गालबोट ; दोन गटात राडा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ फेब्रुवारी २०२३ । राज्याचे लक्ष लागलेल्या कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी सात वाजेपासून सुरुवात झाली. भाजप, महाविकास आघाडी तसेच बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार?, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

मात्र, या पोटनिवडणुकीला गालबोट लागले आहे. आज मतदान सुरू होताच चिंचवड येथील मतदान केंद्रावर दोन गटात जोरदार राडा झाला. पिंपरी-गुरव येथील मतदान केंद्रावर माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये प्रथम बाचाबाची व नंतर हाणामारी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.

दोन गटांमध्ये वाद नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. किरकोळ कारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, अशी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत समर्थकांमधील वाद मिटवला. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली नाही. सध्या पिंपरी-गुरव येथे तणावाचे वातावरण असले तरी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. दरम्यान, चिंचवड मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत. येत्या 2 मार्च रोजी निवडणूक निकाल लागणार आहे. दरम्यान, भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अश्विनी जगताप म्हणाल्या, मी नेहमी साहेबांना मतदान करायचे, आज मी स्वत:ला मतदान केले. थोडसं वेगळं वाटलं. दरवेळी साहेब असायचे, मी त्यांना मतदान करायचे, पण आज स्वत:ला मत देतेय, या भावनेने मनाला हुरहुर वाटली. तर, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत नागरिक माझ्या बाजूने आहेत, असा विश्वास राहुल कलाटे यांनी यावेळी व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम