
पोटनिवडणुकीत मनसेचे तळ्यात-मळ्यात ; उद्या शेवटचा दिवस !
दै. बातमीदार । ६ फेब्रुवारी २०२३ । पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पोटनिवडनुकीवर राज्यातील राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच पक्षांना आवाहन केले होते कि हि निवडणूक बिनविरोध करावी. मात्र निवडणुकीचं तापलेलं वातावरण पाहता मनसेनंही पुरेशी तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक बिनविरोध झालीच नाही तर उमेदवार देण्याची तयारीही मनसेने केल्याचं समजतंय.
राज ठाकरे सध्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची त्यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत कसबा पेठ पोट निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बिनविरोधसाठी राज ठाकरे उद्यापर्यंत वाट पाहणार आहेत. तशी घोषणा झाली नाही तर मनसे उद्यापर्यंत वेगळा निर्णय घेऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मंगळवार अर्थात 7 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. आज भाजप तसेच काँग्रेसच्या उमेदवाराने मोठं शक्ति प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपकडून हेमंत रासणे तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
बावनकुळे नाना पटोलेंची भेट घेणार?
ज्या आमदाराचं निधन होतं, त्या ठिकाणी पोट निवडणूक लागल्यास संबंधित पक्षाच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून दिलं जातं, अशी महाराष्ट्रातील परंपरा आहे. त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन भाजपतर्फे करण्यात येतंय. मात्र भाजपचा असा कोणताही प्रस्ताव आमच्यापर्यंत आला नसल्याचं, नाना पटोले यांनी म्हटलंय. तर बिनविरोध निवडणुकीसाठी आपण स्वतः काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांची भेट घेऊ, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.
भाजपने मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी नाकारून हेमंत रासणे यांना तिकिट दिलं. त्यामुळे टिळक कुटुंबियांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. आता टिळक कुटुंब भाजपाला साथ देणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजप नेते जगदीश मुळीक यांनी आज टिळक कुटुंबियांची भेट घेतली. टिळक परिवाराची नाराजी दूर करण्यासाठी ही भेट असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र यापुढील प्रचारासंबंधी बोलण्यासाठी भेट घेतल्याचं मुळीक यांनी सांगितलं. उद्यापासूनचं नियोजन कसं असणार हे ठरवण्यासाठीची भेट असल्याचं मुळीक यांनी सांगितलं. शैलेश टिळक आणि कुणाल टिळक उद्यापासून भाजपच्या बैठकांना उपस्थित असतील, असंही मुळीक यांनी सांगितलं.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम