ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचा जोर ओसरला !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ ऑगस्ट २०२३ | देशभरातील अनेक राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागातर्फे ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरताना दिसत आहे.

तर आज ९ ऑगस्टला राज्यात वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रात पावसाची उघडीप असताना उत्तर भारतात मात्र ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. राज्यात ढगाळ हवामानासह उघडीप राहील असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील काही भागात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मुंबई, पुण्यासह महत्वाच्या शहरांमध्येही पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ४ धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून शहराला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये आतापर्यंत २६.०७ टीएमसी म्हणजे ८९.४४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्याने चारही धरणातील पाण्याची आवक मंदावली आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सातही तलाव क्षेत्रांत समाधानकारक पाऊस पडत आहे. सध्या तलावांत ३०६ दिवस म्हणजे पुढील दहा महिने पुरेल इतका (८१.४४ टक्के) पाणीसाठा आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही अशी स्थिती कायम राहील, असा अंदाज असल्याने सध्या लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणीकपात बुधवार (ता. ९) पासून रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम