दै. बातमीदार । ३ डिसेंबर २०२२ । राज्यात गेल्या काही दिवसापासून काही ठिकाणी थंडीचा जोर वाढला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे चित्र आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, पुढचे दोन दिवस म्हणजे पाच डिसेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं थंडीचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. सदर तापमान वाढ कदाचित डिसेंबरचा पहिला आठवडा संपेपर्यंत म्हणजे सात ते आठ डिसेंबरपर्यत जाणवू शकते.
मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण जाणवणार
उत्तर भारतातील स्थिरावलेल्या किमान तापमानामुळं महाराष्ट्रात सुद्धा अपेक्षित असलेल्या किमान तापमानाच्या घसरणीला ब्रेक जाणवत आहे. महाराष्ट्रात कमाल तापमानात विशेष फरक जाणवण्याची शक्यता जाणवत नाही. राज्यात पुढचे दोन दिवस थंडीचा जोर कमी होणार असताना दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण जाणवणार असल्याची शक्यता देखील माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता
मराठवाड्यात तापमानाचा पारा घसरला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहेय तिथेही ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. मराठवाड्यात तापमानाचा पारा दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. सध्या मराठवाड्यात आठ ते 10 अंश सेल्सिअस तापमान आहे. औरंगाबाद गंगापूर तालुक्यात ग्रामीण परिसरात आज पहाटे सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली होती. पसरलेल्या दाट धुक्यात गाव आणि शेत-शिवार हरवल्याचे चित्र पाहावयास मिळाले. धुक्याची चादर इतकी दाट होती की, 10 ते 15 फुटावर दिसणेही मुश्किल झाले होते. पहाटेपासून पसरलेल्या दाट धुक्याच्या चादरीमुळे सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान सूर्यदर्शन झाले. या धुक्यामुळे रब्बी पिकावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळ शेतकरी चिंतेत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम