राज्यात मुसळधार बरसणार पाऊस ; या भागांना ‘यलो अलर्ट’ जारी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जुलै २०२३ ।  देशातील बदलत्या हवामानामुळे राज्यात देखील कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागलेली असतांना हवामान विभागाने राज्यातील काही भागांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सोमवारपासून राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कोकणासह मुंबई, ठाणे भागात चांगला पाऊस पडतो आहे. नांदेड, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात केली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरसंच महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागांसह ठाणे आणि सातारा जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. त्यामुळं आलपल्ली- भामरागड मार्ग बंद झाला आहे तर काही छोट्या नाल्यांना पूर आल्याने इतर सात छोटे मार्ग बंद. जिल्ह्यात एकूण आठ मार्ग बंद झाले आहेत. दक्षिण गडचिरोली भागात पाऊसाचा जोर अधिक आल्याने या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातही गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदीला पूर आला असून ती सध्या पात्राबाहेर ओसंडून वाहते आहे. नदी किनाऱ्यावरील रहिवाशांना प्रशासनातर्फे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस रायगड, रत्नागिरीला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम