मोठी बातमी : राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड !
दै. बातमीदार । ११ मार्च २०२३ । राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा आज पहाटेच ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घराची ईडीकडून झाडाझडती घेतली जात आहे.
कोलकात्यातील बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होती. तसेच, या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली आहे.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या घरावर गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व हसन मुश्रीफ यांचे समर्थक हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. या कारवाईविरोधात व केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. हसन मुश्रीफ सध्या घरी नाहीत. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम