
दै. बातमीदार । १६ डिसेंबर २०२२ । पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १२ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. देशातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), आयआयआयटी (ट्रिपलआयटी) यांसह अन्य शैक्षणिक संस्थांमधील बी. ई. आणि बी.टेक प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘जेईई मेन’ ही परीक्षा यंदा जानेवारी आणि एप्रिल २०२३ अशा दोन सत्रात होणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे २०१९ पासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) जेईई परीक्षा घेण्यात येत आहे. देशात जेईई परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येते. पहिल्या टप्प्यात एनआयटी, आयआयआयटी, केंद्रीय अर्थसहाय्यित तंत्रशिक्षण संस्था, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे येथे बी.ई आणि बी.टेक प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा होतो. तर दुसऱ्या टप्प्यात भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) प्रवेशासाठी ‘जेईई ॲडव्हान्स’परीक्षा घेतली जाते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा जानेवारी आणि एप्रिल २०२३ अशा दोन सत्रात होणार आहे.
जेईई परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी १२ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असणाऱ्या शहरांची नावे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहेत. तर परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) विद्यार्थ्यांना एनटीएच्या संकेतस्थळावर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात उपलब्ध होईल. ही १३ भाषांमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एनटीए’ने संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
जानेवारीत होणाऱ्या ‘जेईई मेन’ परीक्षेच्या तारखा –
– २४, २५,२७,२८,२९, ३० आणि ३१ जानेवारी २०२३
या भाषांमध्ये होणार जेईई मेन परीक्षा –
– इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम्, मराठी, ओडिया, पंजाबी, तमीळ, तेलगू आणि उर्दू
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ –
– www.nta.ac.in
– https://jeemain.nta.nic.in/

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम