दै. बातमीदार । १३ एप्रिल २०२३ । राज्यात नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे कालीचरण महाराज आता अडचणीत सापडले आहेत. नांदेडमध्ये जिल्ह्यातील बिलोली येथे आयोजित धर्मसभेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलोली येथे 9 एप्रिलरोजी राम नवमीनिमित्त ही धर्मासभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून कालीचरण महाराज यांनी भाषण केले होते. धर्मसभेत चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन कालीचरण महाराज यांच्याविरोधात बीलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज यांच्याविरोधात दंगल भडकणे, विशिष्ट समजाच्या भावना दुखावणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराजांवर कलम 153 अ, 295 अ आणि 505- 2 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन ही कारवाई केली आहे. त्यामुळे पोलिस कालीचरण महाराजांव काय कारवाई करणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पोलिस तक्रारीनुसार, नांदेड येथील रामनवमीनिमित्त आयोजित धर्मसभेत कालीचरण महाराजांनी एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. भारतात दंगली एका विशिष्ट समाजामुळेच होतात, असे कालीचरण महाराज म्हणाले होते. कालीचरण महाराजांनी त्यांच्या भाषणादरम्यान लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम