राज्यातून लाखो समाजबांधव पाटलांच्या सभेस्थळी दाखल !
बातमीदार | १४ ऑक्टोबर २०२३
गेल्या काही महिन्यापासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण झाल्यानंतर त्यांनी राज्यभर दौरे केले होते त्यानंतर आज शनिवारी आंतरवाली सराटी येथे लाखोंची सभा होत आहे. शुक्रवारी दुपारपासूनच मराठा बांधव वेगवेगळ्या जिल्ह्यांतून रेल्वे, बसने गावात दाखल होत होते.
सोलापूर, पुणे, नांदेड, जळगाव अशा दूरवरील जिल्ह्यांतून अनेक जण रात्री उशिरापर्यंत दाखल हाेत होते. आंतरवाली सराटी व जालना शहरातील तीन मंगल कार्यालयांमध्ये आदल्या दिवशीच माेठ्या संख्येने मराठा बांधव मुक्कामी आले आहेत. प्रत्येक वाहन व लोकांच्या हाती भगवा झेंडा असल्याने राष्ट्रीय महामार्ग भगवामय झाला होता. सभेसाठी १४०० पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून सभास्थळी पाच डॉक्टरांसह रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. अंबड तालुक्यातील जि.प. शाळांना सुटी देण्यात आली.
मनोज जरांगे पाटील हे गोदाकाठच्या १२३ गावांना सोबत घेऊन मराठा आरक्षणाची मागणी करीत आहेत. या मागणीवर वारंवार आंदोलने, उपोषणे केली आहेत. दरम्यान, आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असताना पोलिसांकडून लाठीचार्ज झाला होता. पोलिसांनी गोळीबारही केला होता. यात अनेक उपोषणार्थीही जखमी झाले होते. यानंतर अनेक दिवस संपूर्ण राज्यात तणाव होता. यानंतर सरकारच्या काही प्रतिनिधींनी उपोषणस्थळी येऊन आरक्षणासाठी ३० दिवसांचा वेळ मागून जरांगे यांचे उपाेषण सोडवले होते. अजून सरकारने आरक्षण जाहीर केले नाही. या पार्श्वभूमीवर १४ ऑक्टोबर रोजी विराट सभा घेतली जात आहे. या अनुषंगाने पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. अनेक समाजबांधव जालना शहरातील अंबड रोडवरील मातोश्री लॉन्स, छत्रपती संभाजीनगर रोडवरील कुसुम लॉन्स व शहरातील भाग्यनगर भागातील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात मुक्कामी थांबले.
शनिवारी सकाळी ११ वाजता सभा असल्यामुळे अनेकांना जालना येथे येऊन रात्रीच थांबावे लागले. वाहने लावून अनेक जण दोन मंगल कार्यालये व काही जण मराठा सेवा संघाच्या कार्यालयात थांबले होते. येथे थांबलेल्यांना जेवण व राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, जळगाव, धुळे, सोलापूर येथून अनेक समाजबांधव आले आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम