लालबागच्या चरणी पहिल्याच दिवशी इतकी आली देणगी !
बातमीदार | २१ सप्टेंबर २०२३
राज्यात सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु असतांना मुंबईतील प्रसिद्ध श्री लालबागच्या राजाच्या चरणी गणेश प्रतिष्ठापनेच्या पहिल्याच दिवशी 42 लाख रुपये रोख व सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दान आल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे. या गणपतीच्या दर्शनाला उत्सवातील दहाही दिवस देश- विदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यात सेलिब्रिटींची संख्याही मोठ्या प्रमाणावर असते. या बरोबरच राजकारणी मंडळींसह सर्वच क्षेत्रातील दिग्गज लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी हजेरी लावतात.
दर्शनाबरोबरच या सर्व भक्तांकडून गणपतीला मोठ्या प्रमाणावर देणगीही दिली जाते. दररोज मंडळाकडून त्याची मोजणी केली जाते. मंगळवारी पहिल्या दिवशी आलेल्या देणगीची मोजणी बुधवारी करण्यात आली. त्यानुसार बाप्पांसमोर पहिल्या दिवशी 42 लाख रुपये रोख, 198.55 ग्रॅम सोन्याचे दागिने, 5 किलो 449 ग्रॅम चांदीचे दागिने दानाच्या स्वरूपात आल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास 20 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवुड कलाकार, राजकीय नेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. उशिरापर्यंत लालबागचा राजा मंडळाकडून पहिल्या दिवशी दान आलेली रोख रक्कम, वस्तूंची मोजदाद पूर्ण करण्यात आली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम