‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात पक्षाच्या झेंड्यावरुन हास्यकाल्लोळ !
दै. बातमीदार । ११ जुलै २०२३ । सकारच्या ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम धुळे शहरात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात झेंड्यावरुन अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. तर भरसभेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अजित पवार यांना प्रत्युत्तर देत तुमची मागणी मान्य केली जाईल, असा विश्वास दिला. त्यामुळे सभास्थानी हास्या पिकल्याचे देखील पाहायला मिळाले.
शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना म्हणाले, आता तीन पक्षांचं सरकार आहे, इथे दोन पक्षांचे झेंडे लावले आहेत तसे आता राष्ट्रवादीचे झेंडे लावायला सुरुवात करा, अशी विनंती मी तुम्हाला करतो. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण झालं. या भाषणात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमची मागणी नक्कीच पूर्ण केली जाईल असे म्हणत अजित पवारांना आश्वस्त केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या वर्षी आपल्या युतीचं सरकार आलं, हे सरकार आता एक वर्षाचं झालं आहे. आपल्या या विकासाच्या कामाला साथ देण्यासाठी अजित पवार आणि त्यांचे सहकारी आमदार आपल्याबरोबर आले आहेत. आपली ताकद आता वाढली आहे. परंतु दादा आमची युती 25 वर्षांची आहे. युती असल्यामुळे शिवसेनेसह भाजपाचे झेंडे लागलेले आहेत. तुमचा राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला वेळ लागतोय. परंतु पुढच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षांचे झेंडे नक्की लागतील. शेवटी हा आपला विकासाचा त्रिशूळ आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले हा आपला विकासाचा त्रिशूळ आहे. या त्रिशूळामुळे समोरच्या विरोधी पक्षाला धडकी भरली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काय करावं ते सुचेनासं झालंय. बघावं तिकडे आपल्या सरकारला पाठिंबा देणारी जनता या राज्यात पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षाची ताकद अगदी कमजोर झाली आहे. ते फक्त आरोप प्रत्यारोप करत आहेत. मोदींवर आरोप करणं हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम