चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ फेब्रुवारी २०२३ । राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेली पोटनिवडणूक पुण्याच्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे हे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, अशी नाना काटे यांची ओळख आहे. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या नगरसेवक आहेत. कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांच्याशी आता मविआचे उमेदवार नाना काटे यांची लढत होईल. अश्विनी जगताप या भाजपच्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत.

महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक 26 फेब्रुवारी रोजी होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे. कसबा तसेच चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेकाप अशी महाविकास आघाडी मैदानात आहे. आज मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महादेव मंदिर पिंपळे सौदागर येथे येत आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही हजर राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम