आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘बीआरएस’ची सभा ; राज्याचे लक्ष लागून !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ एप्रिल २०२३ ।  राज्यात गेल्या दोन महिन्यापासून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने ‘अब की बार किसान सरकार’ हे घोषवाक्य घेऊन पाय घट्ट रोवताना दिसत आहे. या पक्षाची सभा २४ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपासवरील जबिंदा मैदानावर होत आहे.सभेला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ५ वा. सभा होणार असून मुख्यमंत्र्यांचे ४ वाजेच्या सुमारास विमानतळावर आगमन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात पक्षध्वज व होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. विमानतळ ते सभास्थळापर्यंत होर्डिंग्ज आहेत. गोल आकाराच्या होर्डिंग्जने शहरवासीयांचे लक्ष वेधले असून सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगरची ही सभा रेकॉर्डब्रेक होणार असल्याची ग्वाही स्थानिक नेत्यांनी दिली आहे. बीआरएसचे छोटे मोठे अनेक नेते, निरीक्षक, खासदार, आमदार सभेच्या नियोजनासाठी मागील आठवडाभरात पासून शहरात तळ ठोकून आहेत.

के. चंद्रशेखर राव यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्रात बीआरएस वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याची सुरुवात त्यांनी नांदेडपासून केली. नांदेडमध्ये स्थानिक नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील अनेक स्थानिक नेते, शेतकरी नेते तसेच छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सुमारे पन्नास माजी नगरसेवक या सभेत प्रवेश घेणार असल्याचे बीआरएसचे महाराष्ट्र प्रभारी आ. जीवन रेड्डी यांनी सांगितले. आज होणाऱ्या बीआरएसच्या जाहीर सभेत बीआरएसचे सर्वेसर्वा व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे तेलंगणा मॉडेलच्या ४२५ योजनांची माहिती देणार आहेत. रोज सात-आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या महाराष्ट्राने हे मॉडेल स्वीकारावे, असा आग्रह बीआरएसचा आहे.

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची जाबिंदा मैदानावर सोमवारी सायंकाळी पाच वाजता सभा आयोजित केली आहे. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता असल्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती प्रभारी सहायक पोलिस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी दिली. सोमवारी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेदरम्यान शहानूरमियाँ दर्गा चौक ते गोदावरी टी पाॅईंट हा मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी नागरिकांनी इतर मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम