राज्यपाल हटावसाठी एमआयएम उतरणार रस्त्यावर !
दै. बातमीदार । ६ डिसेंबर २०२२ । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका बेताल विधानावरून राज्यभरात भाजप व शिंदे गट सोडला तर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपाल यांच्याबद्दल आक्षेप नोदवत संतापाचे व्यक्त केला आहे. तर शिवप्रेमी रस्त्यावर उतरून आंदोलन करतांना दिसत आहे. दरम्यान आता याच मुद्यावरून एमआयएम देखील आंदोलन करणार आहे. शिवरायांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात एमआयएमकडून उद्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. औरंगाबादच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, भाजपकडून सतत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले जात आहे. तर राज्यपाल यांनी देखील असेच काही विधान केले आहे. त्यामुळे जेव्हा राज्यपालांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते, त्यावेळीच महाराष्ट्राने त्यांचा जोरदार विरोध केला असता तर आज त्यांची अशाप्रकारे विधान करण्याची हिम्मत झाली नसती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सतत भाजपकडून आणि राज्यपाल यांच्याकडून होणाऱ्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी उद्या औरंगाबादच्या क्रांती चौकात एमआयएमकडून निदर्शने केले जाणार असल्याची माहिती जलील यांनी दिली आहे. मुळात आम्ही आजचं आंदोलन करणार होतो, मात्र पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने उद्या हे आंदोलन होणार असल्याचे देखील जलील म्हणाले.
पुढे बोलतांना जलील म्हणाले की, जर राष्ट्रवादी, कॉंग्रेस,शिवसेना, शिंदे सेना यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम असेल आणि आदर असेल तर त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन राज्यपाल यांना परत पाठवण्याचा निर्णय एकमताने घेतला पाहिजे. एमआयएम देखील त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करेल असं जलील म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम