बातमीदार | २७ सप्टेंबर २०२३
राज्यातील शिंदे गटाचे नेते व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचा पीए आणि समर्थकांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे. हि घटना छत्रपती संभाजीनगरातील सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पीएसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर शिवीगाळ केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याविरोधातही सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश शंकरलाल शंकरपेल्ली (रा. शास्त्रीनगर, सिल्लोड) असं मारहाण झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश शंकरलाल शंकरपेल्ली यांनी सिल्लोड शहरातील सर्व्हे नंबर ९२ मधील फेरफारावर आक्षेप घेतला होता. या आक्षेपाविरोधात मंगळवारी तलाठी भवन कार्यालयात सुनावणी होती. सुनावणी संपल्यानंतर महेश शंकरलाल शंकरपेल्ली कार्यालयातून बाहेर पडत होते. शाकेरमियाँजानी, मंत्री अब्दुल सत्तार यांचे पीए बबलू चाऊस, बबलू जब्बार पठाण, शेख अब्दुल बाशीद शेख सादिक व अकील बापू देशमुख (सर्व रा. सिल्लोड) यांच्यासह इतर लोकांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत महेश शंकरपेल्ली यांना दुखापत झाली. दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर महेश शंकरपेल्ली यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार सिल्लोड शहर पोलिसांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पीएसह इतर ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर महेश शंकरपेल्ली यांच्यावर देखील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम