शिंदे गटाचा आमदार अडचणीत ; मुलाने केले व्यावसायिकाचे अपहरण ?
बातमीदार | १० ऑगस्ट २०२३ राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केले व मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर एका स्टॅम्प पेपरवर आपल्याला जबरदस्तीने सह्या करण्यास भाग पाडले, असा गंभीर आरोप मुंबईतील व्यावसायिकाने केला आहे. व्यावसायिकाला मारहाण करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे अडचणीत सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे अपहरण करून प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने व त्याच्या साथीदाराने आपल्याला आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर येथील कार्यालयात आणले होते, असा गंभीर आरोपही व्यावसायिकाने केला आहे.
मुंबईतील वनराई पोलिसांत या प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्यासह मनोज मिश्रा, पद्माकर, विकी शेट्टी आणि इतर 10 ते 12 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. व्यावसायिक राजकुमार सिंह यांनी ही तक्रार केली आहे. या प्रकारामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये तक्रारदार राजकुमार सिंह यांच्या ऑफिसमध्ये शिरून 10-12 जण त्यांना मारहाण करताना दिसत आहेत.
एफआयआरमध्ये तक्रारदार राजकुमार सिंह यांनी सांगितले आहे की, गोरेगाव पूर्व येथे माझी ग्लोबल म्युझिक जंक्शन नावाची कंपनी असून लोन देण्याचे काम करते. तर, मनोज मिश्रा (वय 30, रा. बिहार) यांची अदिशक्ती नावाची म्युझिक कंपनी आहे. मनोज मिश्रा यांना पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी आपल्या कंपनीचे डिजिटल लायसन्स एका वर्षासाठी गहाण ठेवून आपल्याकडून कर्ज घेतले. 2019 मध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तताही करण्यात आली. त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये 8 कोटी रूपये लोन घेतले होते. हे करारपत्र हे 5 वर्षांचे होते. 5 वर्षांमध्ये झालेल्या कराराप्रमाणे आम्हास 11 कोटी रूपये मिळणार होते.
राजकुमार सिंह यांनी सांगितले की, मात्र मनोज मिश्रा यांनी आमचे लोन चॅनेल कंटेट बनविण्याकरिता न वापरता इतर जागी वापरले. त्यामुळे आमच्या कंपनीचा नफा कमी झाला. मी त्याला चॅनेलमध्ये कंटेट बनविण्याकरिता सांगितले असता त्याने माझ्याकडे अधिक पैशांची मागणी केली. मी त्याला नकार दिला. त्यानंतर हा कराराच रद्द करण्यासाठी ते माझ्यावर दबाव टाकू लागले. त्यानंततर जुन 2023 व जुलै 2023 मध्ये एकूण 1 कोटी रूपये त्याच्या कंपनीच्या बॅक खात्यात दिले व चॅनल व्यवस्थित चालविण्यास सांगितले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम