
नवीन बसस्थानकात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट
नवीन बसस्थानकात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट
दोन विद्यार्थ्यांचे महागडे मोबाईल लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी : शहरातील नवीन बसस्थानक आवारात मंगळवारी (दि. २३ डिसेंबर) सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास दोन तरुणांचे महागडे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेणारे निखिल राजू मानके (वय २०, रा. धानवड, ता. जळगाव) आणि मयुर मांगू पाटील (वय २०, रा. चिंचखेडा, ता. जळगाव) हे दोघे मंगळवारी सायंकाळी नवीन बसस्थानक परिसरात थांबले होते. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोघांचेही महागडे मोबाईल लंपास केले. काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बसस्थानक परिसरात सर्वत्र मोबाईलचा शोध घेतला, मात्र कोणताही सुगावा लागला नाही.
अखेर बुधवारी (दि. २४ डिसेंबर) सायंकाळी सहा वाजता त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अलका शिंदे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम