महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा मोदी सरकारचा डाव ; नाना पटोले !
बातमीदार | १२ सप्टेंबर २०२३ | देशात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकीची सर्वच पक्षांनी तयारी केली असून आता सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची फैरी सुरु असतांना दिसत आहे. यामध्ये कॉंग्रेस देखील आता मागे नाही. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला आहे.
दरम्यान नाना पटोले म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने भाजपच्या डोळय़ात खुपत आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी मोदी सरकारने येथील जागतिक वित्तीय केंद्र, हिरे व्यापार, एअर इंडियाचे मुख्यालय मुंबईबाहेर हलवले. आता मुंबईतील शेअर बाजार गुजरातला घेऊन जायचा डाव आहे असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार अडथळा ठरत होते. म्हणूनच केंद्र सरकार व राज्यपाल यांच्या मदतीने सरकार पाडले. आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून मुंबई व महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मुंबईतील महत्त्वाची कार्यालये व प्रकल्प बाहेर घेऊन जात असल्याबद्दल मोदींना जाब विचारून दाखवावा, असे आव्हानही नाना पटोले यांनी केले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम