मोदी, शाहंच्या सभेचा परिणाम झाला नाही ; पवारांचे कौतुकातून टीकास्त्र !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ मे २०२३ ।  कर्नाटकमधील काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत आहे. दुपारी २ वाजता काँग्रेस १३४ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे भाजप ६४ तर जेडीएस २२ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या कलांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस आणि कर्नाटकी जनतेचं कौतुक केलं.

शरद पवार म्हणाले की, मोदी, शाह यांनी कर्नाटकमध्ये सभा घेऊनही काहीही परिणाम झाला नाही. मागच्या वेळी कर्नाटक त्यानंतर मध्य प्रदेश, गोवा येथेही भाजपने फोडोफोडी केली होती. मात्र यावेळी जनतेने तीही संधी भाजपकडून हिरावून घेतली. कर्नाटकात ६५ ठिकाणी भाजपला कल आहे तर काँग्रेसला १३३ ठिकाणी विजयाचे संकेत मिळत आहेत. सत्तेचा गैरवापर, साधनांचा गैरवापर, फोडाफोडीचं राजकारण; यामुळे वैतागलेल्या जनतेने भाजपला धडा शिकवला आहे. मुळात कर्नाटकच्या जनतेला हे आवडलं नव्हतं. त्यामुळे काँग्रेसचा विजय झाला.

देशात चुकीचं वातावरण निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना जनतेने धडा शिकवला आहे. मी काँग्रेस आणि जनतेचं अभिनंदन करतो. बहुसंख्य राज्यामध्ये भाजप सत्तेबाहेर आहे. २०२४मध्ये देशात होणाऱ्या निवडणुकांनंतर चित्र वेगळं असेल. धर्म आणि जात याचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर नेहमी यश येत नाही, असाच या निकालांचा अर्थ आहे, असं शरद पवार म्हणाले. पवार पुढे म्हणाले की, पार्लमेंटमध्ये सेक्युलॅलिझमची शपथ घेऊन बजरंगबलीचा मुद्दा उपस्थित करणं चूक होतं. महाराष्ट्र एकीकरण समितीला अपयश आलं आहे. एकीकरण समिती आणि तिथले अन्य पक्ष यांच्यात एकवाक्यता राहिली नव्हती, त्यामुळं पराजय झाला. महाराष्ट्रात आम्ही महाविकासआघाडीची बैठक दोन दिवसांनी बोलावली आहे. एकत्र बसून पुढची चर्चा होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम