राज्यात मोगलाई अवतरली ; राऊतांची सरकारवर टीका !
दै. बातमीदार । २० एप्रिल २०२३ । ठाकरे गटाचे आ.नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली आहे. एकीकडे खारघरमध्ये पाण्याशिवाय श्रीसेवकांना तडफडून मारले, तर दुसरीकडे पाण्यासाठी आक्रोश केला म्हणून अटक करत आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन राऊत आक्रमक झाले आहेत.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी संघर्ष यात्रा काढली. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर खाऱ्या पाण्याच्या टँकरसह ते आंदोलन करणार होते. परंतु नागपूर ग्रामीण पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना नागपूरपासून 30 किमीवरील धामणा येथेच अडवले.
संजय राऊत म्हणाले, खारयुक्त पाण्यासाठी नितीन देशमुख यांनी आंदोलन केले. ही मोगलाई आहे. आमदाराला अटक केली. याला मोगलाई नाही म्हणायचे तर काय. लोकांना पाण्यासाठी, रोजगारासाठी, प्रवेशासाठी आंदोलन करु देत नाही. आज कहर झाला. पाणी मागणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे. हे औरंगजेबाचे राज्य आहे. मोगलाईचे धडे पुस्तकातून काढले मात्र प्रत्यक्ष मोगलाईचा कारभार सुरु आहे. नितीन देशमुख यांच्यासह आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर देशमुख हे जमिनीवर झोपले. मात्र, काही पोलिसांनी देशमुख यांचे हात तर काहींनी पाय पकडून त्यांना अक्षरश: उचलून ताब्यात घेतल्याचे दिसून आले. पोलिसांच्या या कारवाईनंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम