मुंबईत मान्सूनला सुरुवात ; ‘या’ ठिकाणी बरसणार मुसळधार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ जून २०२३ ।  जून महिना सुरु होवून आता २० दिवस झाले असले तरी अद्याप राज्यात पाऊस नसल्याने अनेक शेतकरी टेन्शनमध्ये आले असतांना एक मोठी बातमी समोर आली आहे. आता मान्सूनची प्रतीक्षा संपली असून राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, मुंबईसह अनेक भागात आज सकाळी पाऊस सुरू झाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे पुढील चोवीस तासांमध्ये आयएमडीकडून राज्यातील काही शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात जोरदार पाऊस झाला. पुण्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. पण मुंबईत झालेला पाऊस हा मोसमी पाऊस होता का? यासंदर्भात अद्याप हवामान विभागाने अपडेट्स दिलेले नाही. मात्र, येत्या चोवीस तासांत मान्सून मुंबईला भिजवणार, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झालं आणि बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनच्या प्रगतीवर मोठा परिणाम झाला. मात्र चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल मान्सूनने विदर्भात हजेरी लावल्यानंतर आता पुढे सरकरत पुण्यातही पाऊस झाला. यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशा परिस्थितीत विदर्भातील जनतेला उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. तर आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम