राज्यात मान्सून आठ दिवस उशिरा धडकणार !
दै. बातमीदार । १२ जून २०२३ । राज्यातील अनेक शेतकरी मान्सूनची वाट बघत असतांना मान्सून यंदा केरळमध्ये अपेक्षेपेक्षा उशिरा म्हणजे ८ जूनला दाखल झाला. त्यामुळे त्याचा पुढील प्रवासही उशिराच होईल अशी अपेक्षा होती. मात्र अरबी समुद्रातील चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्याने मान्सूनची वाटचाल गतीने झाली व तो अपेक्षेपेक्षा आठ दिवस लवकर रविवारी (११ जून) संपूर्ण गोव्यासह तळकोकणात दाखल झाला. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, वातावरण असेच राहिले तर येत्या ४८ तासांत मुंबईत, तर उर्वरित महाराष्ट्रात तो १५ ते १७ जूनदरम्यान दाखल होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला.
रविवारी कोकण वगळता राज्यातील काही भागात उन्हाचा पारा वाढलेला होता, तर कुठे अंशत: ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानात १ ते २ अंश घट झाली. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत साेमवारी जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. केरळमध्ये यंदा मान्सून उशिरा ८ जूनला दाखल झाला. अरबी समुद्रात बिपॉरजॉय चक्रीवादळाची निर्मिती झाल्याने मान्सूनच्या वाटचालीबाबत भीती निर्माण झाली होती. परंतु, चक्रीवादळ हे समुद्रात उत्तरेकडे सरकल्याने मान्सूनच्या वाटचालीला पोषक वातावरण तयार झाले. रविवारी मान्सून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम