कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासू झाल्या सरपंच तर पाडळकर यांच्या घरात ३ पदे !
दै. बातमीदार । २० डिसेंबर २०२२ । राज्यात आज सर्वच जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निकाल लागले आहे व चित्र देखिल पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे तर राज्यातील दिग्गज किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार यांनी संगमनेरच्या निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करून ते सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. दुसरीकडे भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री यांनी सांगलीमधील पडळकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी बाजी मारली आहे.
अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. आज निवडणुकीचा निकाल लागला असून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला नारळ देत 227 मतांनी विजय मिळवला आहे. समर्थकांकडून सांगण्यात येत आहे की, शशिकला पवार या भाजपला पाठिंबा देणार आहे, मात्र त्यांच्याकडून अशी काही घोषणा करण्यात आली नाहीये. संगमनेरमध्ये काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आमदार आहेत. मात्र भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांचे समर्थक त्या भाजपला पाठिंबा देणार असल्याचे दिसून येत आहे. सांगलीमधील पडळकरवाडी येथे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गावात त्यांच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारली आहे. तर प्रतिस्पर्धी पॅनेलचा धुव्वा उडवत सातही पडळकर समर्थक उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
पडळकरवाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या 300 मतांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. भाजप आणि शिंदे गट एकत्र सत्तेत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील तानाजी पाटील यांनी कमलाबाई गोरड यांना उमेदवारी देत पडळकरांना आव्हान दिले होते. गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मदेव पडळकर हे सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, तर आता पडळकरांच्या आई हिराबाई पडळकर या पडळकरवाडीच्या सरपंच म्हणून कारभार पाहणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम