IndiGo च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई विमानतळावर ई-मेल प्राप्त
देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडला धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या या ई-मेलमध्ये इंडिगोच्या विमानाला बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दै. बातमीदार | २ ऑक्टोबर २०२२ | इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई विमानतळावर अचानक एकच खळबळ उडाली. मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीला यासंदर्भात धमकीचा ई-मेल आला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा ई-मेल शनिवारी रात्री उशिरा आल्याची माहिती मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. त्यावेळी विमानतळावर गोंधळ उडाला होता. तथापि, विमानात काहीही संशयास्पद आढळले नसल्याने ही अफवा असल्याचे तपासानंतर लगेचच आढळून आले.
सहार पोलिस स्टेशनच्या अधिका-यांनी माहिती दिली की ई मेलमध्ये लिहिले आहे – मी 6E 6045 फ्लाइट उडवणार आहे. या संदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ बी अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
इंडिगोने या घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की बॉम्बच्या धमकीमुळे 1 ऑक्टोबर 2022 रोजी इंडिगो फ्लाइटवर परिणाम झाला होता. हे विमान मुंबईहून अहमदाबादला जात होते.
निवेदनानुसार, विमान उडवण्याची धमकी मिळताच त्यासंबंधीचा तपास सुरू करण्यात आला. संपूर्ण प्रोटोकॉल पाळला गेला. सर्व तपास पूर्ण झाल्यानंतरच विमानाने उड्डाण घेतले. तथापि, कंपनीने आपल्या निवेदनात फ्लाइटला उशीर झाला आणि त्यामुळे किती प्रवासी नाराज झाले याची फारशी माहिती दिलेली नाही.
मुंबईचे छत्रपती शिवाजी विमानतळ अदानी समूह आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे संयुक्तपणे चालवले जाते. यासाठी MIAL संयुक्त उपक्रम तयार करण्यात आला आहे. इंडिगो ही देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. इंडिगो विशेषतः देशातील छोट्या विमानांमधून स्वस्त भाड्याने उड्डाण करण्यासाठी ओळखली जाते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम