उर्फीला मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस ; जाणून घ्या सविस्तर !
दै. बातमीदार । १४ जानेवारी २०२३ । राज्यातील अभिनेत्री व महिला नेत्या वाद गेल्या काही दिवसापासून चव्हाट्यावर आला आहे तर नुकतेच उर्फी जावेदने रुपाली चाकणकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता उर्फी जावेदला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
गेल्या काही दिवसात भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे म्हटले होते. असला नंगानाच खपवून घेणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी उर्फी जावेद हीला दिला होता. त्यानंतर उर्फीनेही आपला नंगानाच असाच सुरु राहणार म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिले होते. चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात मुंबई पोलिसांची भेट घेत तक्रार केली होती.
आता सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलिस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. पोलिसांनी उर्फीला आज हजर होण्याची नोटीस जारी केली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. उर्फीच्या विरोधात मुंबईमधील काही महिला सामाजिक संस्था देखील आक्रमक झाल्या आहेत. उर्फी ही सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करते. त्यामुळे समाजातील तरुण मुले मुली यांच्यावर तिचा प्रभाव पडत आहे. त्यामुळे तिच्या विरोधात सक्त कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली होती. उर्फी जावेदने शुक्रवारी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची देखील भेट घेतली आहे. काल उर्फीने महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सार्वजनिक ठिकाणी उर्फीला थोबाड फोडण्याची धमकी दिली होती. त्याप्रकरणी उर्फीने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतच्या भेटीत तक्रार दाखल केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम