
चोपड्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका अज्ञाताचा खून; आरोपी चार तासांत गजाआड
चोपड्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका अज्ञाताचा खून; आरोपी चार तासांत गजाआड
प्रतिनिधी | चोपडा
शहरातील पंचायत समिती सभापती निवासजवळील प्रांगणात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अवघ्या चार तासांतच चोपडा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत खून करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे.
ही घटना २५ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या तिघांमध्ये असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश काशीराम बारेला (वय ३३, रा. चाचऱ्या, ता. सेंधवा) याने, आपल्या पत्नीच्या नात्याने संबंधित असलेल्या जानू राजू बारेला (वय ३५) हिचे अनैतिक संबंध मृत व्यक्तीशी असल्याचा संशय मनात धरून, डोक्यात दगड घालून त्या अज्ञात पुरुषाचा खून केला. तसेच जानूला देखील मारहाण करत जखमी केले.
घटनेनंतर काही वेळातच पोलिसांना मृतदेह आढळून आला. उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या चार तासांत आरोपी राजेश बारेला याला गोरगावले रोडवरून अटक करण्यात आली.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही, तसेच या प्रकरणाचा तपास पुढे सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम