राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस उपयुक्त – डॉ. अनिल चिकाटे
विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एक दिवसीय चर्चा सत्राचे आयोजन
दै. बातमीदार । २६ फेब्रुवारी २०२३ । विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जळगाव आणि विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून या चर्चासत्राचे उद्घाटन डॉ.अनिल चिकाटे, संचालक, ज्ञानस्त्रोत केंद्र, कवियित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुुरूवातीला कार्यक्रमाच्या उद्देश आणि रूपरेषा महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी हितेश ब्रिजवासी यांनी स्पष्ट केली तर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या संबोधनात चर्चा सत्रातील विविध विषयाचे महत्व स्पष्ट केले. तर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.अनिल चिकाटे यांनी आपल्या संबोधनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि त्याचे महत्व सांगून नवीन शैक्षणिक धोरणाची गरज स्पष्ट करत प्राध्यापकांनी विद्यार्थी आणि पालकांशी निरंतर संभाषण ठेवल्यास शिक्षणातील गरजा आणि त्रुटी लक्षात येईल आणि दर्जेदार शिक्षण देण्यास सोयीचे होईल जेणेकरून शैक्षणिक धोरण यशस्वी करण्यास याचा निश्चितच फायदा होईल असे मत व्यक्त केले. चर्चासत्र हे चार सत्रात विभागले गेले
पहिल्या सत्रात भारताची संरक्षण सज्जता या विषयावर प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग प्रमुख, अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव यांनी मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या विविध टप्प्याची आणि कालखंडाची विभागणी करून त्या कालखंडात देशासमोर असलेले संरक्षणात्मक मुद्दे आणि देशाने घेतलेली भूमिका याबद्दल माहिती देऊन संरक्षण सज्जतेसाठी आधुनिकीकरण आणि धोरणे हे कसे महत्वाचे याबद्दल अनेक उदाहरण देऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
दुसऱ्या सत्रात भारतीय संस्कृती आणि आधुनिकता या विषयांवर डॉ. विजयश्रीनाथ कंची, संचालक, ज्ञानस्त्रोत केंद्र, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (स्वायत्त विद्यापीठ) यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने भारताच्या प्राचीन संस्कृतीवर प्रकाश टाकून पाश्चात्य देशाच्या विकासात भारतात प्राचीन काळापासून असलेल्या ज्ञानाचा कसा संबंध आहे याबद्दल अनेक दाखले दिले. तसेच जगाच्या विकासात देखील भारताच्या ज्ञानपरंपरेचा किती मोठा वाटा आहे हे देखील उपस्थितांना समजावून सांगितले.
तिसऱ्या सत्रात भारताचे शैक्षणिक धोरण या विषयावर डॉ.पी.पी.माहुलीकर, प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, यांनी मार्गदर्शन केले आणि भारताचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे येणाऱ्या काळात देशाची दशा आणि दिशा दोन्ही बदलविणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करत या नव्या शैक्षणिक धोरणातील महत्वाच्या बाबी समजावून त्याचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केले.
चर्चासत्राच्या चौथ्या आणि अंतिम सत्रात भारताचे आर्थिक धोरण या विषयावर डॉ.विवेक काटदरे,चेअर-प्रोफेसर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव,यांनी मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनात डॉ.काटदरे यांनी विद्यार्थ्यांना प्राचीन काळातील भारताची संस्कृती आर्थिक दृष्ट्या देखील कशी सुदृढ होती याची माहिती देवून विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून स्वावलंबी व्हावे असा मंत्र दिला. तसेच देशांतर्गत आर्थिक सशक्तीकरण करणे असेल तर यामध्ये शिक्षणाची भूमिका किती महत्वाची आहे हे पटवून दिले. तसेच या चर्चासत्रात डॉ.अखिलेश शर्मा, सहाय्यक प्राध्यापक, मूळजी जेठा महविद्यालय, जळगांव यांनी भारतीय संस्कृती या विषयावर पेपर सादरीकरण केले. यानंतर कार्यक्रमाच्या समारोप सत्रात उपस्थित मान्यवरांनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या चर्चासत्राचे आणि त्यातील विषयांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चर्चासत्रात उपस्थित झालेल्या सर्व सहभागी प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.आशा पाटील यांनी केले. चर्चासत्राच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी व ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.उमेश इंगळे, सौ.आशा पाटील, श्री.हितेंद्र सरोदे, डॉ.संतोष बडगुजर, श्री.मुरलीधर चौधरी, डॉ. वैजयंती चौधरी, सौ.कल्पना पाटील, श्री.सुनील बारी,
यांनी प्रयत्न केले तर संस्थेचे सचिव श्री.विनोद पाटील, व्यवस्थापन अधिकारी श्री. दिनेश ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.किशोर पाठक यांनी मार्गदर्शन केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम