पुणे निवडणुकीत राष्ट्रवादी दोन पाऊल मागे !
दै. बातमीदार । ७ जून २०२३ । कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसला चांगले दिवस आल्याने राज्यात देखील कॉंग्रेस आता जास्त जागा मागत असतांना तत्पूर्वी असलेल्या पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत देखील कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. प्रशासनाकडून त्याची तयारी सुरु झाली आहे. परंतु पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत वाद सुरु झाले आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असताना काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन पावले मागे घेतलीय.
काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेणे टाळले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन पावले मागे आले आहे. परंतु दुसरीकडे पुणे लोकसभा मतदारसंघात तयारीला सुरुवात केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांसह हडपसर आणि खडकवासला मतदारसंघांची जबाबदारी आमदार चेतन तुपे यांच्यावर दिली आहे. आठही विधानसभा मतदारसंघांतील बूथनिहाय कमिट्यांचा आढावा घेऊन त्याची बांधणी करण्याचे काम राष्ट्रवादीकडून सुरू करण्यात आले आहे. या बूथनिहाय कमिट्याची जबाबदारी तुपे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे लोकसभेच्या जागेवर अजित पवार यांनी दावा केला होता. आठवड्याभरापूर्वी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पुण्याची सध्याची परिस्थिती पाहिली तर कुणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिलं पाहिजे. त्यांना पडलेली मतं पाहिली पाहिजेत, त्यानुसार या जागेचा निर्णय होईल. परंतु शनिवारी मात्र काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला.
पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. मुंबईत शनिवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचे यासंदर्भात एकमत झाले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. शहराध्यक्षांना पक्ष संघटनात्मक तयारी करण्याच्या सूचना दिल्या. पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसचं लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच आगामी निवडणुकांसाठीही तयारी करण्याचे आदेशही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम