महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही ; मुख्यमंत्री बोम्मई !
दै. बातमीदार । १० डिसेंबर २०२२ । राज्यातील सीमावाद गेल्या काही दिवसापासून वाद वाढत आहे त्यावर राज्यातील काही खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेत आपले म्हणणे मांडले आहे. तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा महाराष्ट्राला डिवचले आहे. बोम्मई यांनी ट्विट केले आहे की, आपले भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही. कोणतीही तडजोड करणार नाही. महाराष्ट्रातील कन्नडिगांच्या संरक्षणासाठी खबरदारी कर्नाटक सरकारकडून घेतली जात आहे.
विशेष म्हणजे काल महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन कर्नाटकाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत तक्रारी मांडल्या. त्यानंतर बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून या भेटीमुळे काहीही फरक पडणार नाही, अशी वल्गना केली आहे. बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. यापूर्वीही महाराष्ट्राने असे प्रयत्न केले आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमचा न्यायप्रविष्ट खटला मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर तडजोड करणार नाही.
तसेच, आपले उद्याप केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी बोलणे झाले नाही. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांशी बोलणे झाले आहे. सोमवारी कर्नाटकचे खासदार अमित शहा यांना भेटणार आहे. राज्याची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मी देखील लवकरच अमित शहांना भेटणार आहे, असे बसवराज बोम्मई यांनी सांगितले. मी भेटल्यानंतर भाजप अध्यक्ष नड्डा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितले आहे, असा गौप्यस्फोटही बसवराज बोम्मई यांनी केला. महाराष्ट्रात असलेल्या कन्नडिगांच्या संरक्षणासाठी खबरदारी घेतली आहे. याबाबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांशी चर्चा केल्याचा दावाही बसवराज बोम्मई यांनी केला. बसवराज बोम्मई यांनी असे ट्विट करताच ठाकरे गटाने शिंदे सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील मिंधे सरकार कोणतेही ठोस प्रत्युत्तर देत नसल्यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रोज बरळत असून, त्यांचा आडमुठेपणा कायम आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटातर्फे देण्यात आली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम