पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर पवार म्हणाले..आतल्या गोटात !
दै. बातमीदार । २६ मे २०२३ । राज्यातील भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यांच्या निधनानंतर काही नेत्यांनी फलक लावल्याने पुणे लोकसभा निवडणुकीची चर्चा जोरदार सुरु झाली होती. पण ते फलक निघाल्यावर त्यावर चर्चा थांबल्या होत्या. पण सध्या पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुलात पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पुणे निवडणूक विभागाने याबाबत संपूर्ण तयारी केली असून तातडीने निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे.
पुण्यातील लोकसभा पोटनिवडणूकीबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, “मला एक बातमी अशी पण कळली की, मला वाटत होतं की लोकसभेच्या निवडणूकीला एकच वर्ष राहीलं आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. पण बहुतेक पुण्याची… बापट साहेबांचं दुखःद निधन झाल्यानंतर… ती पण पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे.”
“निवडणूक लागल्यानंतर ज्या मित्रपक्षापैकी ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद जास्त आहे ते कसं मोजायचं? वजन करायचं का? तर नाही. त्यासाठी मागे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती घ्यायची. आमदारकीच्या निवडणूकीत कोणाला किती मतं पडली याची माहिती घेतल्यानंतर अंदाज येतो” असेही अजित पवार म्हणाले आहेत.
२९ मार्च २०२३ रोजी पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. पुढील वर्षी म्हणजे एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांसाठी पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. पुणे लोकसभेची ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कसब्यात जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकरांना या निवडणुकीत उतरवण्याची तयारी काँग्रेसची आहे. तर भाजपकडून स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ आणि संजय काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम