५३ लाखांची ऑनलाइन फसवणूक; डोनेशनच्या नावाखाली गंडा, एकास अटक

बातमी शेअर करा...

५३ लाखांची ऑनलाइन फसवणूक; डोनेशनच्या नावाखाली गंडा, एकास अटक

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची माहिती

जळगाव : गुंतवणुकीवर मिळालेल्या नफ्यातील २० टक्के रक्कम ‘धर्मार्थ कार्यासाठी डोनेशन’ म्हणून स्वीकारून एकाला तब्बल ५३ लाख ६५ हजारांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात कांजीभाई भिकाभाई जादव (वय ४२, रा. वेरावल, जि. गिर सोमनाथ, गुजरात) याला जळगाव सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या गुन्ह्यातून ११ लाख ८३ हजारांची रक्कम परत मिळवण्यात सायबर पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुंतवणुकीचं आमिष व ‘डोनेशन’चा सापळा

तक्रारदार यांच्याशी १० जून २०२४ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत व्हॉट्सअ‍ॅपवर ‘अमित मालविया’, ‘आदित्य जैन’, ‘विजय कुमार’ अशा बनावट नावांनी विविध क्रमांकांवरून संपर्क साधण्यात आला. ‘राईज पिरॅमिड एलिट’ नावाच्या प्रकल्पात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन दिलं गेलं आणि प्रारंभी मोठा नफा दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला.

यानंतर, धर्मादाय संस्थेच्या नावाने नफ्यातील २० टक्के रक्कम ‘दान’ म्हणून देण्यास भाग पाडले गेले. अशा प्रकारे ५३ लाख ६५ हजारांची रक्कम वेळोवेळी ऑनलाईन स्वीकारून फसवणूक करण्यात आली. तक्रारदाराने सायबर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती.

समाजकार्यासाठी खर्च दाखवून फसवणूक

तपासादरम्यान, आरोपी कांजीभाई जादव याने एनजीओच्या नावाने बँक खाते उघडून डोनेशनच्या नावाखाली फसवणुकीची रक्कम स्वीकारली व ती समाजकार्याच्या खर्चाच्या नावाखाली दाखवली. मात्र, सायबर पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणातून संपूर्ण बाब उघडकीस आली.

११.८३ लाखांची रक्कम परत मिळवण्यात यश

सायबर पोलिसांच्या कसून तपासानंतर ११ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराला परत मिळवून देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पुढे सुरू असून, इतर संभाव्य गुंतवणूकदारांची माहिती घेतली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम