पंकजा मुंडे ११ दिवसाच्या राज्याच्या दौऱ्यावर !
बातमीदार | २९ ऑगस्ट २०२३ | राज्याच्या राजकारणातून भाजप महिला नेत्या पंकजा मुंडे यांना अगदी बाजूला ठेवण्यात आल्याचे अनेक विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर अनेकांनी पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्यानंतर राजकारणाचा कंटाळा आल्याने दोन महिन्यांचा राजकीय ब्रेक घेणाऱ्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष राजकीय घडमोडींमध्ये सहभागी न होता, शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून लोकांना भेटणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यभरात अकरा दिवसांच्या या दौऱ्यात त्या दहा जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर अडगळीत टाकल्याची भावना पंकजा मुंडे यांच्या मनात असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेकदा नाराजी देखील व्यक्त केली होती. आपण या संदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. तरी देखील भाजपमध्ये कोणतीच हालचाल न झाल्याने अखेर दोन महिन्यांचा ब्रेक घेत त्यांनी चर्चा कमी करण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र, शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून आपण जनतेच्या संपर्कात राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दौऱ्यात नागरिकांना मला भेटण्यासाठी यावे, असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले आहे.
पंकजा मुंडे यांचा हा दौरा श्रावण मासामुळे महादेवांच्या म्हणजे शिवांच्या पूजेसाठी काढण्यात येत आहे. त्याच बरोबर शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गामातेचेही दर्शन या दौऱ्यात पंकजा मुंडे घेणार आहेत. त्यामुळे हा शिवशक्ती दौरा असल्याचे सांगितले जाते. दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडे राजकीय घडामोडी विरहित दौरा करतील का? असा प्रश्न विचारला जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम