नागपुरात H3N2 चा रुग्णाचा मृत्यू !
दै. बातमीदार । १५ मार्च २०२३ । जगभरात २०१९ मध्ये कोरोनाचे मोठे सावट होते त्यानंतर आता H3N2 चे देशभरात रुग्ण वाढताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पुण्यानंतर नागपुरातही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यातच अहमदनगरमध्ये एका रुग्णाच्या मृत्यूमुळे आता राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
H3N2 मुळे नागपुरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मधुमेहासह उच्चरक्तदाबाचा त्रास असलेल्या 78 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली आहे. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता राज्यात नवे संकट उभे राहिले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तब्येत खराब असल्याने रुग्णाची H3N2 ची टेस्ट करण्यात आली होती. या तपासणीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आरोग्य विभागाने डेथ ऑडिट झाल्यानंतरच मृत्यूची नोंद H3N2 चा मृत्यू म्हणून करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या H3N2 विषाणू मुलांसाठी धोकादायक बनला आहे. पाच वर्षांखालील मुले याच्या विळख्यात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये आयसीयू तुडुंब भरले आहेत. बाधित बहुतेक मुलांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बाधित मुलांवर अँटीबायोटिक देखील काम करत नाहीत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2013 पासून पुण्यात एकूण 2,529 नमुने तपासण्यात आले. यापैकी 428 (सुमारे 17 टक्के) H3N2 विषाणू पॉझिटिव्ह आढळले आहेत. 15 फेब्रुवारीनंतर घेतलेल्या नमुन्यांमध्ये या विषाणूने ग्रस्त मुलांची संख्या सर्वाधिक आहे. एनआयव्हीच्या शास्त्रज्ञ डॉ. वर्षा पोतदार यांनी सांगितले की, हे नमुने गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (SARI) ची लक्षणे असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांचे आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम