पवारांच्या ‘या’ आदेशाने : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी लागली कामाला !
दै. बातमीदार । १८ मे २०२३ । आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राज्यातील सर्वच पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी निवडणुकांमध्ये अनेक जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षांनी बैठका, दौरे आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १७ मे रोजी पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभेच्या क्रमांक दोनवर असलेल्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिलेत.
2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील 288 मतदारसंघापैकी 48 मतदारसंघामध्ये क्रमांक दोनची मते मिळाली होती. तर लोकसभेच्या 48 मतदारसंघांपैकी 15 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला क्रमांक दोनची मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता राष्ट्रवादीच्या बहुतेक लढती या शिवसेनेसोबत झाले आहेत. राज्यातील 48 विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला क्रमांक दोनची मते मिळाली आहेत. यातील 18 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची लढत ही शिवसेनेसोबत होती. तर लोकसभेच्या निवडणुकीचा विचार केला असता राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला क्रमांक दोनची मते होती. यापैकी आठ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची लढत शिवसेनेसोबत झाली होती. त्यामुळे आगामी काळात जागांवरुन राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम