शिंदेसह भाजपला जनता वैतागली ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० एप्रिल २०२३ ।  कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला निर्विवाद यश मिळालं आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातला शेतकरी हा सध्याच्या सरकारला आणि भाजपला वैतागला असून हे निकाल ही या सरकारच्या कंबरड्यात मारलेली पहिली लाथ आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारेल्या विविध प्रश्नांवर ते बोलत होते. सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढताना संजय राऊत म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समित्या हे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था आणि संघटना आहेत. आतापर्यंत आपल्याला माहीत असेल की शिवसेना या निवडणुकांमध्ये फार कधी ताकदीने उतरली नव्हती. यावेळी शिवसेना महाविकास आघाडीसह बाजार उत्पन्न समितीच्या निवडणुकीत उतरली आणि भाजपचे लोक काहीही आकडे लावू द्यात. पण आपण सगळे आकडे पाहिले तर महाविकास आघाडीला बाजार उत्पन्न समित्यांमध्ये निर्विवाद यश मिळालं आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी हा सध्याच्या सरकारला, भाजपला वैतागला आहे, त्याला घालवायला निघाला आहे. आणि ही सरकारच्या कंबरड्यात पहिली लाथ मारली आहे. मुख्य म्हणजे मिंधे गटातले आमदार, मंत्री आहेत, त्यांच्या मतदार संघात शिवसेनेची पॅनल्स विजयी झाली आहेत. हा एक चांगला संकेत आणि लोकांच्या मन की बात स्पष्ट झाली आहे. पारोळा असेल, मालेगाव असेल किंवा अन्य अनेक भाग, जिथे जिथे शिवसेनेशी गद्दारी केलेले आमदार आहेत, तिथे शिवसेनेचं किंवा महाविकास आघाडीचंच पॅनल विजयी झालं आहे. ज्यांनी ज्यांनी शिवेसेनेवर अत्यंत घाणेरड्या पद्धतीने हल्ले केले. ते सगळे लोकं या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. हा लोकमताचा कौल आहे, हा समजून घेतला पाहिजे. आम्ही वारंवार सांगतोय की आम्ही निवडणुकांना सामोरं जायला आम्ही तयार आहोत, ते या लोकांच्या हिमतीवर. ज्या 14 महानगरपालिका आहेत, आमची मागणी आहे की तुम्ही निवडणुका घ्या. पण, काल जसे निकाल लागले तसे निकाल लागतील अशी तुम्हाला भीती आहे. ही सुरुवात आहे. विधानसभा, लोकसभा, महानगर पालिका अशा प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळेल अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात निर्माण झालं आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम