आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार ; राज्यात उमटू लागले पडसाद !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ सप्टेंबर २०२३ | राज्यातील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटा गावात चार दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटत असून मराठा समाज ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहे.

जालना जिल्ह्यातील सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्रही लिहिले आहे.

जालना शहरातील अंबड चौफुलीजवळ आज 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. भूसार मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. ​सुरक्षेच्या दृष्टीने गेवराई-शेवगाव मार्ग पोलिसांनी बंद केला. छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने शेवगाव मार्गाने वळवण्यात आली. याठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेवराई, संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस डेपोत ठेवल्या असून सोडलेल्या नाहीत. गेवराईतून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसेस सध्या बंद आहेत. रस्ता सुरळीत होईल तेव्हा सोडण्यात येतील, असे बीडचे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी सांगितले. आज मराठा समाजाकडून जालना, धाराशिव, बीड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच, शुक्रवारी रात्री कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर आगारातील बसेसचीही तोडफोड करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम