राड्यानंतर शिवतीर्थावर पोलीस बंदोबस्त वाढविला : लाखो शिवसैनिक दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ नोव्हेबर २०२३

महाराष्ट्रासह देशभरातील शिवसैनिक आज शिवतीर्थावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होऊन त्यांना मानवंदना देतील. बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज सकाळपासूनच शिवतीर्थावर रीघ लागली आहे.

गुरुवारी रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देवून आदरांजली वाहिली. यावेळी शिंदे गटाचे अनेक नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला वंदन करुन गेल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर मोठा वाद निर्माण झाला. ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर भिडले. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्वात शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार…गद्दार…अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली. तर रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून शिवाजी पार्कचा ताबा घेण्याचे काम सुरु होते. तरी देखील दोन्ही गटाकडून घोषणाबाजी थांबली नव्हती.

कालच्या या राड्यानंतर आज शीवतीर्थावरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच, काल ज्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. स्मृतिदिनाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही पूर्वसंध्येला जाऊन दर्शन घेतले. तरीही जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम