
पंकजा मुंडेना अशोक चव्हाण यांचा राजकीय सल्ला !
दै. बातमीदार । १४ जानेवारी २०२३ । राज्यातील भाजप पक्षात अनेक नेते नाराज असल्याचे त्यांनी उघडपणे जाहीर केल्यावरही पक्षाकडून कुठलीही उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत असतानाच पंकजा मुंडे यांनी आता शिवसेनेत यावे असे ठाकरे गटातील नेत्यांनी आग्रह केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर कॉंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंडे यांना सल्ला दिला आहे.
या संदर्भात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे या कर्तृत्ववान नेत्या आहेत. त्यांना उत्तम राजकीय जाण आहे. त्यामुळे कोणत्या घोड्यावर बसल्यावर जास्त फायदा आहे, हे त्यांनी ठरवायचं आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये वारंवार अन्याय होत आहे. त्यांना डावलण्यात येत आहे. आगामी निवडणुकांपूर्वी त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. अशातच त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेत यावं अशी विनंती केली आहे. यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, ‘ गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांचं काम मी पाहतोय. सभागृहात त्या प्रभावीपणे काम करतात. त्यांना उत्तम जाण आहे. त्यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणत्या पक्षात जावं, यावर मी भाष्य करण्याची गरज नाही. कुठल्या घोड्यावर बसल्यामुळे फायदा होऊ शकतो, हे त्यांनी ठरवायचंय, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम