
मुंडे भावाबहिणीतील पुन्हा राजकीय वैर चव्हाट्यावर !
दै. बातमीदार । ४ मार्च २०२३ । राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते आता मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनेचे नेते धनजंय मुंडे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंडे भावाबहिणीतील पुन्हा राजकीय वैर चव्हाट्यावर आले आहे.
बीड जिल्ह्यातील कौठळी येथील जल जीवन मिशन योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या कि, तुम्हाला चपटी देणारा नेता पाहिजे का, असा सवाल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जनतेला विचारला. राजकारणात चारित्र्यहीन व्यक्ती व्हिलन असे, असा टोलाही त्यांनी हाणला.
पंकजा यांच्या या टीकेवर आता धनंजय मुंडे काय उत्तर देतात हे पाहावे लागेल. विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यावेळी पंकजा यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. मात्र, आता त्या पुन्हा एकदा आक्रमक झाल्यात. पंकजा मुंडे म्हणाल्या की, तुम्हाला कसा नेता हवा आहे? घरा-घरात पाणी देणारा नेता हवा आहे की, घरा-घरात चपटी देणारा नेता हवा आहे. पिढी घडवणारा नेता हवा आहे की, बिघडवणारा नेता हवा आहे? असा सवाल त्यांनी केला.
परळीमध्ये भुयारी गटार योजनेच्या नावाखाली रस्ते फोडले. त्यानंतर विकास केल्याची दवंडी पिटवली जातेय, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना हाणला. योजना केंद्राची, सरकार आमचे आणि उदघाटनाला भलतेच पुढे येतात, असा चिमटाही त्यांनी काढला. मुंडे साहेबानंतर तुम्ही सगळे माझे नाव घेता. कारण तुम्हाला चांगला नेता हवा आहे. मी निवडणूक हरले आणि तुमचे मोबाइलवरचे मेसेज बंद झाले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. खोटे गुन्हे दाखल करणारा, तमाशा दाखवणार, मत विकत घेणारा, पैसे वाटणारी चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातला व्हिलन असतो, अशी टीका त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम