दै. बातमीदार । ५ एप्रिल २०२३ । देशात अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात पण काही चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादात अडकत असतात. गेल्या काही महिन्याआधी शाहरुख खान यांचा ‘पठाण’ चित्रपट वादात अडकला होता पण त्या चित्रपटाने तुफान कमाई देखील केली होती. हि घटना ताजी असतांना आता आदिपुरुष सिनेमाच्या पोस्टरमुळे वाद निर्माण झाला आहे. दिग्दर्शक ओम राऊत तसेच प्रभास आणि क्रिती सेनॉन या कलाकारांविरुद्ध मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी सनातन धर्माचे संत संजय दीनानाथ तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत फिर्याद दिली आहे. काही दिवसांपूर्वी आदिपुरुषच्या निर्मात्यांनी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर नवीन पोस्टर रिलीज केले होते. पोस्टरमध्ये प्रभास आणि सनी धनुष्यबाणांसह चिलखत आणि धोतर परिधान केलेले दिसत आहेत. तर क्रितीने साधी केशरी रंगाची साडी नेसली असूनन डोक्यावरून पदर घेतला आहे. तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत असून तिघांच्याही सेवेत नतमस्तक होताना दिसतात. सीतामातेच्या भांगामध्ये सिंदूर नाही, हनुमानाची दाढी मुस्लिम व्यक्तीसारखी दिसते अशीही टीका करण्यात येत आहे.
तक्रारदार संजय दीनानाथ तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, ‘रामचरित्रमानस’ या पवित्र ग्रंथातील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या चरित्रावर ‘आदिपुरुष’ सिनेमा बनवण्यात आला आहे. त्यांनी आरोप केला की ‘आदिपुरुष’च्या नवीन पोस्टरमध्ये भगवान राम यांना हिंदू धर्मग्रंथ रामचरित्र मानसमध्ये जसे दाखवले आहे त्याच्या परस्पर विरुद्ध सिनेमात दाखवण्यात आले आहे. तक्रारदाराने असाही दावा केला आहे की रामायणातील सर्व पात्रांनी जानवं घातलं नाही, ज्याला हिंदू सनातनी धर्मात वेगळे महत्त्व आहे. गेल्या वर्षी आदिपुरुषचा टीझर रिलीज झाला होता. तो देखील वादात सापडला होता. कारण म्हणजे ज्या प्रकारे हिंदू देवतांना दाखविण्यात आले त्यामुळे अनेक लोक दुखावले गेले होते. राणव बनलेल्या सैफ अली खानच्या दाढी आणि मिशांवरुनही लोक नाराज झाले होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम