गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | २३ एप्रिल २०२४ | गरोदरपणा म्हणजे डोहाळे लागणे असे समीकरणच झाले आहे आपल्याकडे. त्यामुळे वेगवेगळ्या चवींचे पदार्थ खाल्ले जातात आणि त्यास प्रोत्साहनही दिले जाते. पण मूळात अशा प्रकारे वेगवेगळ्या चवींचे पदार्थ खावेसे वाटणे हे आपल्यातील कमतरतेचे लक्षण असते.

डोहाळे म्हणजे शरीरातील योग्य पोषणघटकांची कमतरता! तसेच, अनेक गर्भवती स्त्रियांना संतुलित आहाराचे महत्व कळल्यामुळे खारट, आंबट, गोड पदार्थांपेक्षा सुकामेवा, फळे, पालेभाज्या यांचे आहारातील योग्य प्रमाण डोहाळ्यांचा क्षणिक मोह टाळण्यास मदत करू शकते. गरोदरपणाच्या प्रत्येक टप्प्यावर कॅलरीजचे प्रमाण १६००-२००० इतके वाढू शकते. अशावेळी नेहमीपेक्षा योग्य आणि जास्तीचे अन्न खाणे आवश्यक ठरते. वजनवाढीला घाबरून कमी अन्न खाण्यापेक्षा आहारविषयक सल्ला घेऊन त्याप्रमाणे आहारनियमन करणे गरोदर स्त्रियांना उपयुक्त ठरते.

गरोदरपणात महिलांनी आहाराची पथ्यं काटेकोरपणे पाळणे आवश्यक असते. मात्र हा तोच कालखंड असतो, जेव्हा अनेक लोक भरपूर खाण्याचा सल्ला देतात. शिवाय डोहाळे नावाची एक संकल्पनाही गरोदरपणातील खाण्यापिण्यासाठी अनेकदा वापरली जाते. डोहाळे सुरू झाले म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी तिखट, आबंट, तूरट आणि प्रसंगी गोडदेखील खावेसे वाटते आणि ते गरोदर महिलेला द्यावे, असा एक समज आपल्याकडे रूढ आहे. पण या काळात खरंच काय करायचे असते. काय खावे, किती खावे आणि काय टाळावे या विषयी फारसे कुणी मार्गदर्शन करताना दिसत नाही. त्याचविषयी आपण समजून घेऊ.

गर्भधारणेच्या आधीपासून आहाराची व्यवस्थित काळजी घेतल्यास ‘विशिष्ट डोहाळे’ आढळून येत नाहीत. संतुलित आहाराची आखणी आणि नियमित व्यायाम हा गर्भधारणा झालेली महिला आणि बाळ म्हणजे बाळ व बाळंतीण दोघांसाठीही उत्तमच.

आहारतज्ज्ञ म्हणून डोहाळ्यांची वैज्ञानिक आणि शरीरशास्त्राच्या चष्म्यातून पाहणी करताना डोहाळे अन्नातील कॅलरीज आणि पोषणाची कमतरता दर्शवितात, हे ठळकपणे सिद्ध होते.

गोड पदार्थ – योग्य कर्बोदके आणि प्रथिनांची कमतरता

आंबट पदार्थ – क जीवनसत्त्व आणि लोह यांचे कमी प्रमाण

बर्फ/ थंड पदार्थ – लोह आणि अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेची कमतरता

मेण – आवश्यक स्निग्धांशाची कमतरता

माती/ टूथपेस्ट / खडू – कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक यांची कमतरता

याच कमतरतेची तिसऱ्या महिन्यापासूनच वाढीव औषधे घेणे आवश्यक ठरते; ज्यामध्ये लोह, प्रथिने ,कॅल्शिअम यासाठी औषध स्वरूपात पोषणतत्त्वे मिळतील याची काळजी घेतली जाते.

शरीरातील संप्रेरकांचे बदलते प्रमाण अस्वस्थपणा, उलट्या आणि जळजळ यासाठी कारणीभूत ठरू शकते. यावर आहारातील उपचार म्हणजे योग्य प्रमाणात पाणी हळूहळू आणि शक्यतो बसूनच पिणे. आलं- लिंबू यांचे पाणी किंवा पुदिन्याचे पाणी पिणे. प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये प्रथिनांचा समावेश असण्याबाबत सजग राहणे. रोज किमान ४ फळे आवर्जून खाणे (विविध फळे) तीव्र गंध (उग्र वास) असणाऱ्या पदार्थापासून दूर राहणे. जळजळ कमी करण्यासाठी ताजे दही खाणे. योग्य प्रकारे बसून जेवणे. खाताना बसून खाणे हेही तेवढेच महत्त्वाचे असते.

गरोदरपणात पूर्णपणे वर्ज्य करावेत, असे अन्नपदार्थ.

१) कच्ची कडधान्ये

२) कोणत्याही धान्यांचे कच्चे पीठ

३) कच्चे दूध

४) उघड्यावरील ज्यूस

५) पपईच्या बिया

६) उघड्यावर ठेवलेला अननस किंवा उघड्यावरील कोणतेही फळ

७) अर्धवट उकडलेले / अर्धवट शिजलेले अंड

८) अर्धवट शिजलेला पास्ता किंवा चिकन

ई- कोली (E -Coli) किंवा सालमोनेला (Salmonella) सारखे संसर्ग टाळण्यासाठी तसेच बाळाच्या आरोग्यासाठी वरील पदार्थ हानिकारक आहेत. अनेकदा कच्चे मांसाहारी पदार्थ बाळामध्ये बहिरेपणा, अंधत्व, मेंदूचे विकार आणि कमी वाढीसाठी कारणीभूत ठरतात.

दारू पिणे सगळ्यांसाठीच हानिकारक आहे, स्त्रियादेखील त्याला अपवाद नाहीत. गरोदरपणात दारूचे सेवन बाळाच्या कमी वजनासाठी आणि आयुष्यभराच्या विविध विकारांसाठी कारणीभूत ठरू शकते.

गरोदरपणात वाढणारे वजन गर्भवाढीसाठी देखील आवश्यक असते. अनेक महिला पहिल्या महिन्यापासूनच प्रयत्नपूर्वक सुकामेवा, तूप यांचे प्रमाण वाढवितात. परिणामी वजन अवाजवी वाढते आणि तिसऱ्या महिन्यातच डॉक्टर वजनावर अंकुश ठेवण्याचा सल्ला देतात. गर्भवाढीसाठी वजनवाढ करताना नेमके किती वजन वाढायला हवे, यावर लक्ष देणे अगदी महत्त्वाचे आहे. साधारणपणे ८-१२ किलो वजनवाढ अपेक्षित.

गरोदरपणात व्यायाम करताना विशेष निगराणीखाली व्यायाम करणे अत्यंत फायदेशीर ठरते. व्यायामामुळे स्नायूंना बळकटी मिळते, हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आरोग्यदायी प्रसुतीसाठी शरीर तयार होऊ शकते. नवमातेचे मानसिक आरोग्य उत्तम राहते. शरीरातील अतिरिक्त चरबी वाढण्याचे प्रमाण कमी होते. गर्भधारणेला नियमित जीवनशैलीचा भाग करत आहार- विहारात जाणीवपूर्वक बदल केल्यास गर्भाची वाढ आणि नवमातेचे आरोग्य उत्तम राहू शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम