राज्यात अवकाळी पावसाची हजेरी ; जिल्ह्यांना अलर्ट जारी
दै. बातमीदार । १६ मार्च २०२३ । देशातील बदलत्या हवामानाच्या काही राज्यातील शेतकरीना चांगलाच फटका बसत असल्याची चित्र आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगरसह सातारा, पुणे, धुळे, वर्धा, नंदूरबारमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे.
हवामान विभागाने राज्यात 18 मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषत: फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील बहुतांश भाग हा अवकाळी पावसाच्या ढगांनी व्यापल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. हवामान विभागाने उपग्रह छायात्रित्रही जारी केले आहे. त्यात महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, ओडिशा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांवर अवकाळी पावसाचे ढग जमा झाल्याचे दिसत आहे. या भागात पुढील काही तासांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील जवळपास 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत आज दिवसभरात मुसळधार पावसाची शक्यता असून गरज असेल तेव्हाच नागरिकांनी घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम